सुरक्षा यंत्रणांकडून १७५ संशयित ताब्यात   

पहलगाममधील क्रौर्य
 
श्रीनगर : पहलगाममधील नरसंहारानंतर सुरक्षा दलाने दक्षिण काश्मीरमध्ये जोरदार कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा दलांकडून अनंतनाग, पुलवामा, कुलगाम, शोपियामध्ये शोध मोहीम सुरु आहे. गेल्या ४८ तासांत १७५ हून अधिक संशयितांना सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. तर, पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांना काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने कळवा, असे आवाहन केले जात आहे.
 
दरम्यान, काश्मीरमध्ये १४ स्थानिक दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. गुप्तचर संस्था जम्मू-कश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार करत आहे. हे स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करतात. त्यांना आश्रय आणि संसाधने पुरवतात, असा संशय आहे. दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. यात बहुतांश पर्यटक आहेत. या हल्ल्याचा तपास एनआयएमार्फत केला जात आहे.
----------
एनआयएकडून जबाब नोंदविण्याचे काम सुरु
 
कोलकाता : पहलगाममधील नरसंहाराचा राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) तपास केला जात आहे. या हल्ल्या प्राण गमवालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम एनआएचे अधिकारी करत आहेत. एनआयएचे एक पथक शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाले. या पथकाने काल समीर गुहा यांच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या निवासस्थाला भेट दिली. 
 
एनआयएचे पथक दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बितन अधिकारी यांच्या पत्नीचीही वैष्णवघाटा परिसरात भेट घेऊन त्यांचा जबाब नोंदवेल, असे त्यांनी सांगितले.जम्मू आणि काश्मीर पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दल हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. या दहशतवाद्यांच्या शोधासाठी युद्धपताळीवर मोहीम राबविली जात आहे. दाट जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) आणि ड्रोनसारख्या अद्ययावत उपकरणांची मदत घेतली जात आहे.या हल्ल्यात पाच ते सात दहशतवादी सहभागी होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यामध्ये पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.

Related Articles